मालिकांची शीर्षकगीते हा एक गाण्याचा वेगळा प्रकार आहे असं मला वाटतं. अशी शीर्षकगीतं मला स्वत:ला खूपच आवडतात. माझ्या iPod वर 'मराठी मालिकांची शीर्षक गीते' असा वेगळा folder पण आहे. अत्यंत catchy अशा tune मुळे ही गीतं आपल्या लक्षात राह्तात. आणि मला वाटतं त्याच हेतूने ती तयार केलेली असतात.
शीर्षक गीताचं लेखन आणि संगीत हा एक आव्हानात्मक प्रकार असावा कारण जेमतेम १२ ते १५ सेकंद हे गाणं वाजतं. तेवढया वेळात तुम्हाला त्या मालिकेचा विषय, त्यातल्या chatacters बद्दल थोडीफार माहिती आणि पुढे पुढे ती मालिका ज्या प्रकारे वळण घेणार आहे त्याबद्दल थोडंफार वक्तव्य एवढं सगळं सांगायचं असतं...मग संगीतकारापुढचं आव्हान हे असतं की शीर्षकगीताची tune इतकी catchy हवी की ती प्रत्येक माणसाला अगदी सहज गुणगुणता आली पाहिजे. मालिका पुढेमागे लोकं विसरतात पण ही शीर्षक गीतं आपल्या अनेक वर्षानुवर्ष लक्षात राहतात....कित्येक शीर्षक गीतांना स्वतंत्र गाण्याचा दर्जा ही मिळतो. याची तीन उत्तम उदाहरणं म्हणजे 'संस्कार', गोटया आणि'महाश्वेता' या मालिकांची शीर्षकगीते.
तेजस्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षा असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार
मना घडवी संस्कार.....
या गाण्याचे शब्द आणि संगीत इतकं छान आहे की याला स्वतंत्र गाण्याचा दर्जा मिळाला नसता तरच नवल. असंच दुसरं एक अत्यंत सुंदर शीर्षकगीत होतं ते 'गोटया' या मालिकेचं.
बीज अंकूरे अंकूरे
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात.....
हेही गाणं फक्त मालिकेपुरतं न राहता लोकांच्या कायमचं लक्षात राहिलं.
आणि तिसरं अत्यंत अप्रतिम शीर्षकगीत होतं ते महाश्वेता या मालिकेचं...हे गीत आधीच तयार केलेलं होतं की मालिकेसाठी खास तयार गेलं हे मला माहित नाही पण त्या गाण्याने आपल्या मनावर कायमचा परिणाम केला हे मात्र नक्की.
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते
तू मला शिकविली गीते....
पूर्वी दूरदर्शनवर अनेक छान छान मालिका लागत..पार्टनर, श्वेतांबरा, एक शून्य शून्य, परमवीर, हॅलो इंस्पेक्टर, गोटया, संस्कार, असे पाहूणे येती, चाळ नावाची वाचाळ वस्ती.....सगळ्याचीच शीर्षकगीतं आता संपूर्ण आठवत नाहीत पण त्यातल्या त्यात गोटय़ा, संस्कार, परमवीर, महाश्वेता आणि हॅलो इंस्पेक्टर या मालिकांची शीर्षकगीतं मात्र संपूर्ण चालीसकट पाठ आहेत आणि मलाच नाही तर माझ्या मित्रांनादेखील.
जो करी जीवाची होळी
छातीवर झेलून गोळी
जो देशद्रोह नीत जाळी
तो परमवीर....
आणि
रात्रंदिनी संरक्षणी
जागून जो शोधी गुन्हा
पोलिस हा
सुरक्षिततेसाठी जागरूक हा
हॅलो हॅलो हॅलो हॅलो इंस्पेक्टर.........
त्यानंतर 'झी मराठी' चा जमाना आला आणि 'दूरदर्शन' मागे पडलं. दूरदर्शन वरच्या मालिका १३ किंवा अगदीच मोठया असतील तर ५२ भागांच्या असत पण 'झी' चा जमाना आल्यावर मालिकांचे हजारो भाग बनायला लागले. Daily soaps चा जमाना आला. पुढच्या भागाची वाट बघत एक आठवडा थांबण्याइतका वेळ आणि patience लोकांकडे नव्ह्ता. किंबहूना त्यांना तो दिलाच गेला नाही. पण इतकं सगळं होऊनही मालिकांच्या शीर्षकगीतांमधला गोडवा कमी झाला नाही. 'झी मराठी' वरची पहिली दैनंदिन मालिका म्हणजे 'आभाळमाया'. ही जशी अत्यंत लोकप्रिय झाली तशी त्याचं शीर्षकगीतही.
जडतो तो जीव, लागते ती आस
बुडतो तो सूर्य, उरे तो आभास
कळे तोच अर्थ, उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग
दाटते ती माया, सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव, ते तर आभाळ
घननिळा डोह, पोटी गूढ माया
आभाळमाया........
पुढे मग गेल्या दहा वर्षात रेशीमगाठी, ऊनपाऊस, राऊ, वादळवाट, नुपूर, जगावेगळी, अधुरी एक कहाणी, एक घागा सुखाचा, मानसी, कॉमेडी डॉट कॉम अशा अनेक मालिका आल्या, वर्षानुवर्ष चालू राहिल्या आणि संपल्यादेखील..काही मालिका तर संपूर्णच्या संपूर्ण पुन्हा एकदाही दाखवल्या गेल्या. 'अवंतिका' आणि 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकांनी झी मराठीच्या लोकप्रियतेत भरच घातली. 'अवंतिका' चं शीर्षक गीतंही लोकांना खूप आवडायचं
सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे
जीवनाशी ती कधीची भांडते आहे
दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती
वेगळे काहितरी बघ सांगते आहे
जीवनाचे एक गाणे गात जाताना
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सुख आणिक दु:खवेडी अवंतिका......
तर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेला खास शब्द असलेलं शीर्षक गीतच नव्हतं पण तो प्रयत्नही यशस्वी झाला आणि मालिकेच्या सुरुवातीला वाजणारे..
सोयम तोयम तननुम तुम तानानी....
हे चित्रविचित्र शब्दही लोकांच्या तोंडात बसले.
जाताजाता झी मराठी च्या दोन वेगळ्या मालिकांचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही आणि त्या म्हणजे ' पिंपळपान ' आणि 'श्रावणसरी'. पिंपळपान मधून मराठीतील अत्यंत मान्यवर अशा लेखकांच्या कलाकृतींचं पडद्यावरून मालिकेच्या रुपात सादरीकरण केलं जात असे..या मालिकेचं शीर्षकगीत तर The Best म्हणता येईल इतकं सुंदर होतं.
आठवणींचा लेऊन शेला नटून बसली माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती
जगण्यामधल्या अर्थासंगे बहकून गेले अक्षररान
वा़रयावरती थिरकत आले झाडावरून पिंपळपान......
मराठीतील स्त्री लेखिकांच्या कथा पडद्यावरून मालिकेच्या रुपात सादर होत असत ते या ' श्रावणसरी' मालिकेद्वारे..या मालिकेचं शीर्षकगीतंही अत्यंत समर्पक असं होतं.
सोशिक माती अशी सारखी वर्षावाने भिजे
युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे
केव्हा हसणे केव्हा रडणे कधी सोसणे कळा
असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा
कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी....
मराठीत काही दूरदर्शन आणि झी मराठी या दोनच वाहिन्या नाहीत. E TV, मी मराठी सारख्या अनेक आहेत पण या दोन वाहिन्यांवरची शीर्षक गीतंच सगळ्यात जास्त जवळची वाटली हे मात्र खरं..आजही मला ती तितकीच जवळची वाटतात. विशेषत: drive करताना मी ती खास ऐकते. तेव्हाच का ते मला माहिती नाही पण कदाचित ती मला माझ्या पूर्वीच्या दिवसांमध्ये घेऊन जात असावीत. ते दिवस जेव्हा माझ्या हातात गाडीही नव्हती आणि iPod ही.
Wednesday, February 11, 2009
Little(?) Champs....
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEio2uN1k_JdDOMcpx2pjaZIyd4Hyl6pDfpDvG5oHhbRdc9WRS6-caAw27cJkZxIBSnK38cjm5DlvPqR9LZppZI47F0XFwOEdc9o129VlZX61zb28o4vb92RC7xpgfd7q5RDvHh2rq-G4Vk/s200/Image4.jpg)
गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेलं 'सारेगमप Little Champs' चं पर्व अखेर ८ फेब्रुवारीला संपलं. Little Record Maker कार्तिकी गायकवाड 'महाराष्ट्राचा उद्याचा आवाज' ठरली. सारेगमप या कार्यक्रमाचं मला वाटतं हे सगळ्यात वेगळं आणि सगळ्यात लोकप्रिय पर्व असावं. असावं कशाला? होतंच.
या Little Champs नी महाराष्ट्राला किंवा देशालाच नाही तर सगळ्या जगाला आपला लळा लावला होता. कोण कुठली ती मुग्धा, कार्तिकी किंवा आर्या आणि कोण कुठले ते प्रथमेश आणि रोहित पण ते प्रत्येकाला आपल्याच घरातले वाटत होते. घराघरातून ' ए तुझा support कुणाला आहे?' किंवा 'मला आजकाल ती आर्या आवडायला लागलेय' असे संवाद ऎकू येत होते. India ला फोन केल्यावर सुद्धा इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर 'मग काय यावेळचा एपिसोड बघितला की नाही?' अशीच चर्चा व्ह्यायची. ज्यांना तो कार्यक्रम live बघायला मिळायचा नाही ते लोकं youtube वर video upload व्हायची वेडयासारखी वाट बघत रहायचे.
या कार्यक्रमात त्याचे असे बारिकसारीक दोष नक्की होते, तसं बघायला गेलं तर दोष कुठल्या कार्यक्रमात नसतात?...पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन विचार करायचा झाला तर या कार्यक्रमाने फक्त little champs नाच नाही तर आपल्यालाही खूप काही दिलं....विस्मृतीत गेलेली जुनी जुनी अतिशय उत्तम अशी मराठी गाणी या निमित्ताने पुन्हा एकदा लोकांना ऐकायला मिळाली, आजची नवीन पिढी काय कमाल....... आहे ते लोकांना कळलं. आज आजी आणि नात या कार्यक्रमामुळे एकत्र बसून TV बघायला लागल्या. Lyrics लिहिलेला कागद समोर न ठेवता कितीही कठीण कठीण गाणी म्हणता येतात हे लोकांना पटलं.
पूर्वी TV वर रामायण-महाभारत या अशा मालिका होत्या की त्या शक्यतो कुणीही चुकवत नसे. सारेगमप चं ही तसंच झालं होतं. सर्वसामान्य लोकच नाही तर अनेक celebrities सुद्धा हा कार्यक्रम आवर्जून वेळात वेळ काढून बघत असत. Zee ने या कार्यक्रमाद्वारे मुलांचं फक्त गाणंच फूलवलं नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास केला. कधीही स्वप्नातसुद्धा ज्यांची भेट कठीण वाटावी अशा लता-ह्रदयनाथ-आशा-उषा , किशोरी आमोणकर अशा दिग्गजांपर्यंत Little champs ना सहज पोचता आलं. 'वसंतोत्सवा'सारख्या लोकप्रिय आणि दर्जेदार कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली, एखाद्या गाण्याची actual recording process कशी असते हे अनुभवायला मिळालं...NDA सारख्या ठिकाणी भेट दिल्यामुळे आपल्या देशासाठी लढणारे सैनिक कसे 'तयार' होतात हे बघायला मिळालं.
या 'सारेगमप' चे विशेष निमित्ताने सादर झालेले काही episodes तर खूपच लक्षात राहण्यासारखे होते. एक म्हणजे 'बालदिना'च्या दिवशी या little champs ना 'black & white'च्या काळातील नायक-नायिकांसारखी वेशभूषा करून त्यांना गाणी सादर करायला लावली होती तो episode. मग २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात आपले प्राण गमावणारया शहिदांना श्रद्धांजली म्हणून सादर झालेला episode आणि आत्ता 'प्रजासत्ताक दिनाच्या' निमित्ताने स्वत: ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून साकारलेला 'शूरा मी वंदिले' हा episode. या episode ला प्रेक्षकात 'विशेष अतिथी' म्हणून उपस्थित असलेल्या शहिदांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या कहाण्या ऐकताना अंगावर अक्षरश: शहारे उभे राहिले. या कार्यक्रमात त्यांना बोलावलं नसतं तर या कहाण्या कधी आपल्यापर्यंत पोचल्याच नसत्या.
या सारेगमप project चाच एक sub-project म्हणजे त्यांचा 'मस्ती की पाठशाला' हा कार्यक्रम. हा कार्यक्रम मला भन्नाट आवडायचा. Actual कार्यक्रमात शहाण्यासारख्या वागणारया या Little champs ची मजा-मस्ती-खोडया पाहताना लहानपण आठवायचं, एखाद्याला ठरवून बकरा केलेलं बघताना धम्माल यायची..Zee marathi च्या सगळ्या team चे हे Little champs लाडके होते आणि माझेही. एक एक जण eliminate झालेला बघताना त्यांच्याप्रमाणे माझ्याही डोळ्यात पाणी यायचं. शमिका भिडे आणि शाल्मली सुखटणकर या दोघी eliminate झाल्या तेव्हा जरा जास्तीच वाईट वाटलं. कारण 'शमिका'ची maturity आणि शाल्मली ची 'टिपरें'ची acting आवर्जून आवडायची. वाईट जरी वाटत असलं तरी शेवटी ही competition आहे हे सत्य मुलांना स्विकारता यायलाच हवं हेही वाटायचं. आपण elimiate झाल्याचा निकाल शमिका ने ज्या maturity ने स्विकारला त्यामुळे ती कायम लक्षात राहिल. एक जण eliminate झाला तर सगळ्यांच्या आया रडायच्या, एखाद्याच्या पालकांना एखाद दिवशी शुटिंगला यायला जमलं नाही तर दुसरयांच्या आया त्या मुलांची आपल्या स्वत:च्या मुलाप्रमाणेच काळजी घ्यायच्या. हे सगळं पाहिल्यावर एक नक्की जाणवायचं की या मुलांमधली competition ही अत्यंत healthy होती. आणि याच भावनेची आज नवीन पिढीला सगळ्यात जास्त गरज आहे.
Monday, February 9, 2009
फूलपंखी....
Subscribe to:
Posts (Atom)