Wednesday, February 11, 2009

मराठी मालिकांची शीर्षकगीतं....

मालिकांची शीर्षकगीते हा एक गाण्याचा वेगळा प्रकार आहे असं मला वाटतं. अशी शीर्षकगीतं मला स्वत:ला खूपच आवडतात. माझ्या iPod वर 'मराठी मालिकांची शीर्षक गीते' असा वेगळा folder पण आहे. अत्यंत catchy अशा tune मुळे ही गीतं आपल्या लक्षात राह्तात. आणि मला वाटतं त्याच हेतूने ती तयार केलेली असतात.

शीर्षक गीताचं लेखन आणि संगीत हा एक आव्हानात्मक प्रकार असावा कारण जेमतेम १२ ते १५ सेकंद हे गाणं वाजतं. तेवढया वेळात तुम्हाला त्या मालिकेचा विषय, त्यातल्या chatacters बद्दल थोडीफार माहिती आणि पुढे पुढे ती मालिका ज्या प्रकारे वळण घेणार आहे त्याबद्दल थोडंफार वक्तव्य एवढं सगळं सांगायचं असतं...मग संगीतकारापुढचं आव्हान हे असतं की शीर्षकगीताची tune इतकी catchy हवी की ती प्रत्येक माणसाला अगदी सहज गुणगुणता आली पाहिजे. मालिका पुढेमागे लोकं विसरतात पण ही शीर्षक गीतं आपल्या अनेक वर्षानुवर्ष लक्षात राहतात....कित्येक शीर्षक गीतांना स्वतंत्र गाण्याचा दर्जा ही मिळतो. याची तीन उत्तम उदाहरणं म्हणजे 'संस्कार', गोटया आणि'महाश्वेता' या मालिकांची शीर्षकगीते.

तेजस्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षा असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार
मना घडवी संस्कार.....

या गाण्याचे शब्द आणि संगीत इतकं छान आहे की याला स्वतंत्र गाण्याचा दर्जा मिळाला नसता तरच नवल. असंच दुसरं एक अत्यंत सुंदर शीर्षकगीत होतं ते 'गोटया' या मालिकेचं.

बीज अंकूरे अंकूरे
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात.....

हेही गाणं फक्त मालिकेपुरतं न राहता लोकांच्या कायमचं लक्षात राहिलं.

आणि तिसरं अत्यंत अप्रतिम शीर्षकगीत होतं ते महाश्वेता या मालिकेचं...हे गीत आधीच तयार केलेलं होतं की मालिकेसाठी खास तयार गेलं हे मला माहित नाही पण त्या गाण्याने आपल्या मनावर कायमचा परिणाम केला हे मात्र नक्की.

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते
तू मला शिकविली गीते....

पूर्वी दूरदर्शनवर अनेक छान छान मालिका लागत..पार्टनर, श्वेतांबरा, एक शून्य शून्य, परमवीर, हॅलो इंस्पेक्टर, गोटया, संस्कार, असे पाहूणे येती, चाळ नावाची वाचाळ वस्ती.....सगळ्याचीच शीर्षकगीतं आता संपूर्ण आठवत नाहीत पण त्यातल्या त्यात गोटय़ा, संस्कार, परमवीर, महाश्वेता आणि हॅलो इंस्पेक्टर या मालिकांची शीर्षकगीतं मात्र संपूर्ण चालीसकट पाठ आहेत आणि मलाच नाही तर माझ्या मित्रांनादेखील.

जो करी जीवाची होळी
छातीवर झेलून गोळी
जो देशद्रोह नीत जाळी
तो परमवीर....

आणि
रात्रंदिनी संरक्षणी
जागून जो शोधी गुन्हा
पोलिस हा
सुरक्षिततेसाठी जागरूक हा
हॅलो हॅलो हॅलो हॅलो इंस्पेक्टर.........

त्यानंतर 'झी मराठी' चा जमाना आला आणि 'दूरदर्शन' मागे पडलं. दूरदर्शन वरच्या मालिका १३ किंवा अगदीच मोठया असतील तर ५२ भागांच्या असत पण 'झी' चा जमाना आल्यावर मालिकांचे हजारो भाग बनायला लागले. Daily soaps चा जमाना आला. पुढच्या भागाची वाट बघत एक आठवडा थांबण्याइतका वेळ आणि patience लोकांकडे नव्ह्ता. किंबहूना त्यांना तो दिलाच गेला नाही. पण इतकं सगळं होऊनही मालिकांच्या शीर्षकगीतांमधला गोडवा कमी झाला नाही. 'झी मराठी' वरची पहिली दैनंदिन मालिका म्हणजे 'आभाळमाया'. ही जशी अत्यंत लोकप्रिय झाली तशी त्याचं शीर्षकगीतही.

जडतो तो जीव, लागते ती आस
बुडतो तो सूर्य, उरे तो आभास
कळे तोच अर्थ, उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग
दाटते ती माया, सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव, ते तर आभाळ
घननिळा डोह, पोटी गूढ माया
आभाळमाया........

पुढे मग गेल्या दहा वर्षात रेशीमगाठी, ऊनपाऊस, राऊ, वादळवाट, नुपूर, जगावेगळी, अधुरी एक कहाणी, एक घागा सुखाचा, मानसी, कॉमेडी डॉट कॉम अशा अनेक मालिका आल्या, वर्षानुवर्ष चालू राहिल्या आणि संपल्यादेखील..काही मालिका तर संपूर्णच्या संपूर्ण पुन्हा एकदाही दाखवल्या गेल्या. 'अवंतिका' आणि 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकांनी झी मराठीच्या लोकप्रियतेत भरच घातली. 'अवंतिका' चं शीर्षक गीतंही लोकांना खूप आवडायचं

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे
जीवनाशी ती कधीची भांडते आहे
दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती
वेगळे काहितरी बघ सांगते आहे
जीवनाचे एक गाणे गात जाताना
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सुख आणिक दु:खवेडी अवंतिका......

तर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेला खास शब्द असलेलं शीर्षक गीतच नव्हतं पण तो प्रयत्नही यशस्वी झाला आणि मालिकेच्या सुरुवातीला वाजणारे..

सोयम तोयम तननुम तुम तानानी....

हे चित्रविचित्र शब्दही लोकांच्या तोंडात बसले.

जाताजाता झी मराठी च्या दोन वेगळ्या मालिकांचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही आणि त्या म्हणजे ' पिंपळपान ' आणि 'श्रावणसरी'. पिंपळपान मधून मराठीतील अत्यंत मान्यवर अशा लेखकांच्या कलाकृतींचं पडद्यावरून मालिकेच्या रुपात सादरीकरण केलं जात असे..या मालिकेचं शीर्षकगीत तर The Best म्हणता येईल इतकं सुंदर होतं.

आठवणींचा लेऊन शेला नटून बसली माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती
जगण्यामधल्या अर्थासंगे बहकून गेले अक्षररान
वा़रयावरती थिरकत आले झाडावरून पिंपळपान......

मराठीतील स्त्री लेखिकांच्या कथा पडद्यावरून मालिकेच्या रुपात सादर होत असत ते या ' श्रावणसरी' मालिकेद्वारे..या मालिकेचं शीर्षकगीतंही अत्यंत समर्पक असं होतं.

सोशिक माती अशी सारखी वर्षावाने भिजे
युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे
केव्हा हसणे केव्हा रडणे कधी सोसणे कळा
असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा
कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी....



मराठीत काही दूरदर्शन आणि झी मराठी या दोनच वाहिन्या नाहीत. E TV, मी मराठी सारख्या अनेक आहेत पण या दोन वाहिन्यांवरची शीर्षक गीतंच सगळ्यात जास्त जवळची वाटली हे मात्र खरं..आजही मला ती तितकीच जवळची वाटतात. विशेषत: drive करताना मी ती खास ऐकते. तेव्हाच का ते मला माहिती नाही पण कदाचित ती मला माझ्या पूर्वीच्या दिवसांमध्ये घेऊन जात असावीत. ते दिवस जेव्हा माझ्या हातात गाडीही नव्हती आणि iPod ही.




4 comments:

  1. Very informative article. :) vachatana maja aali :)

    ReplyDelete
  2. Great!!!! mala kharach Khup Avadla Tuza Artical....Maza sudha Baryach athvani ya Shirshak geetanshi nigadit ahet...chan!

    ReplyDelete
  3. मस्त लिहिलं आहेस!
    Somehow Zee Marathiची गाणी ETV Marathi पेक्षा जास्त दर्जेदार आहेत... काय वाटतं?

    ReplyDelete
  4. धन्यवाद..मी जास्त Zee Marathi च बघते त्यामुळे E-Tv वरच्या मालिकांची शीर्षकगीतं खरं सांगायचं तर ऐकलेलीच नाहीयेत. पण तू म्हणतोस तसं असण्याची अगदी शक्यता आहे. तुझी comment वाचून छान वाटलं आणि जाणवलं की मी हे लिहिल्यानंतरही अनेक नवीन मालिकांची शीर्षकगीतं आली आहेत..त्यावर पुन्हा लिहायला हवं.

    ReplyDelete