Tuesday, August 25, 2009

‘प्रपंच’ च्या निमित्ताने............

तुम्हाला वाटेल की हिने पुन्हा एकदा मालिकांबद्दलच लिहिलंय पण त्याला कारणच तसं आहे. झी मराठी वाहिनीने गेल्या काही वर्षांपासून एक चांगला उपक्रम चालू केलाय आणि तो म्हणजे जुन्या १०-१२ वर्षांपूर्वीच्या झी च्या लोकप्रिय मालिका पुन:प्रक्षेपित करण्याचा. या उपक्रमाअंतर्गतच १० वर्षांपूर्वीची एक अत्यंत दर्जेदार मालिका पुन्हा पहायला मिळाली. आणि ती म्हणजे ’प्रपंच’. हे माझ्यासाठी अतिशय pleasant surprise होतं कारण झी मराठी वर ‘बंधन’, ‘मेघ दाटले’,‘रिमझिम’ अशा जुन्या मालिका पुन:प्रसारित होत असताना ‘प्रपंच’ पुन्हा लागेल का? असा विचार माझ्या सारखा मनात येत होता. इतकंच नाही तर‘ झी’ ला इमेल करून ‘प्रपंच’ पुन्हा लावाल का? अशी विनंती करायच्याही मी विचारात होते..पण माझं नशीब फळफळलं आणि ‘प्रपंच’ पुन्हा सुरू झाली.
मला कमालीचा आनंद झाला..सुरुवातीला माझ्या नवऱ्याला कळलंच नाही की एक जुनी मालिका परत सुरू झालेय तर त्यात एवढा आनंद होण्यासारखं काय आहे? कारण पूर्वी त्याने ती पाहिलेली नव्हती..मग तर ती त्याने आवर्जून बघावीच यासाठी मी त्याच्या डोक्यावरच बसले. खरंतर TV वरची कुठली तरी मालिका follow करणं हा त्याचा स्वभाव नाही पण कसं कुणास ठाऊक? तो ती मालिका बघायला लागला आणि मग माझ्याप्रमाणेच तो ही ‘प्रपंच’ चा fan झाला.
इतकं काय होतं त्या मालिकेत?..मुंबईत राहणाऱ्या ‘देशमुख’ नावाच्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा. हे देशमुखांचं कुटुंब हे ‘एकत्र कुटुंब’..आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ झालेली ही गोष्ट..या देशमुख कुटुंबात एकूण ११ माणसं अत्यंत गुण्यागोविंदाने राहताना दाखवलेली आहेत. आजी-आजोबा,काका-काकू आणि सख्खी आणि चुलत भावंड ही सगळी एकाच छपराखाली अत्यंत आनंदाने राह्तात. भर मुंबईत वर्सोव्याला समुद्राकाठी त्यांचं वडिलोपार्जित घर आहे..घरात इतकी माणसं कमी आहेत म्हणून की काय तर आजोबांची अक्का नावाची मोठी बहिण वयाच्या ७०-७५ व्या वर्षी येऊन या कुटुंबात इतकी सामावून गेली आहे की असं वाटावं ती वर्षानुवर्षे इथेच आहे....स्वप्नवत वाटणारं असं हे कुटुंब ‘प्रपंच’ मालिकेत दाखवलं होतं.
आजच्या म्हणजे सध्या विविध वाहिन्यांवर चालू असलेल्या मालिकांपेक्षा ही मालिका वेगळी वाटण्याची अनेक कारणं होती. सगळयात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे अमेरिकेत रहात असताना मुळात कुटुंबालाच आम्ही मुकतो तर एकत्र कु्टुंब ही दुरचीच गोष्ट झाली.शिवाय या मालिकेचा विषय हा अत्यंत साधा होता, घरातल्या कुणालाही कुणाबद्दल हेवेदावे,मत्सर,खुन्नस अशी कोणतीही अस्वाभाविक भावना या मालिकेत दाखवलेली नव्ह्ती. एकाच दृश्यासाठी कॅमेऱ्याचे १० वेगवेगळे angles नव्हते की कान किटवणारं असं पार्श्वसंगीत नव्हतं. प्रतिमा कुलकर्णींचं अत्यंत वेगळं असं दिग्दर्शन याचा या मालिकेच्या यशात महत्त्वाचा वाटा होता.
असं म्हणतात की पडद्यावर जे घडतंय ते खोटं आहे हे आपल्याला माहित असूनही ते खरंच आहे असं आपल्याला वाटायला लावणं हे दिग्दर्शकाचं कसब असतं. ‘प्रपंच’ चं काहिसं असंच होतं. या मालिकेतली पात्रं ही घरात घरातल्याच कपडयात वावरताना दाखवलेली होती. उगीच घरातल्या घरात नटून-थटून बसणारी आणि अत्यंत अनैसर्गिक वाटणारी अशी माणसं यात नव्हती.यातली पदर खोचून काम करणारी आई आणि पांढरा लेंगा घालून पेपर वाचत बसलेले किंवा काहितरी कामानिमित्त सारखी धावपळ करणारे बाबा बघितले की आपलेच आई-बाबा आपण TV वर पाहतो आहोत असं वाटायचं. यातले आजी-आजोबा, नातवंडांनी काही चांगली गोष्ट केली की गरजेइतकंच त्याचं कौतुक करायचे..यातली भावंड एकमेकांबरोबर भांडायची पण वेळ आली की एकमेकांसाठी शब्द आणि जीवही टाकायची. या मालिकेत घरातल्या कुणालाही कसलीही समस्या आली की सगळी जणं सरळ उठून आजोबांकडे सल्ला मागायला जात असत आणि आजोबा प्रत्येकाला समजून घेऊन वेळ पडली तर योग्य रितीने ‘समज’ही देत असत.
खरं तर या मालिकेला निश्चित अशी काहीच कथा नव्हती. देशमुख कुटुंबियांच्या आयुष्यात घडणाऱ्या निरनिराळ्या घटना आणि त्या अनुषंगाने त्या घटनेचे त्यांच्या सगळयांच्या आयुष्यावर एकत्रितपणे होणारे बरेवाईट परिणाम इतकंच या मालिकेत दाखवलं होतं, पण हे दाखवताना १९९९-२००० च्या दरम्यान आपल्या आजुबाजूला ज्या अनेक सामाजिक घटना घडत होत्या त्यांनाही प्रतिमा कुलकर्णींनी या निमित्ताने लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला होता.
‘प्रपंच’ मालिकेत काय दाखवलं होतं एवढंच सांगण्यासाठी हा लेख लिहिलेला नाही तर ही मालिका बघताना मी खूप अंतर्मूख झाले होते..९९ साली या मालिकेने माझ्या मनावर केलेला परिणाम आणि आज २००९ साली पुन्हा याच मालिकेने माझ्या मनावर नव्याने केलेला परिणाम यात खूप अंतर होतं.... तेव्हा सुनिल बर्वे, आनंद इंगळे, सोनाली पंडीत यांच्यासाठी ती मालिका आवडली होती आणि आज ही मालिका भावण्याचं कारण म्हणजे या मालिकेने माझ्या मनात काही प्रश्न निर्माण केले...सुधीर जोशी नावाच्या एका अत्यंत गुणवान अशा नटाचं आपल्यातून इतक्या लवकर आणि एकाएकी निघून जाणं पुन्हा एकदा खूप जाणवून गेलंच पण त्याशिवाय आपल्या देशापासून इतकं दूर अमेरिकेत राहत असताना जेव्हा एखादा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा सल्ला द्यायला एकमेकांशिवाय कुणीच नाही किंवा आधार द्यायलाही मित्रमैत्रिणींशिवाय कुणीच नाही हे आवर्जून जाणवतं. पण मग मनात आलं, मी खऱ्या अर्थाने लांब तरी आहे माझ्या देशापासून..पण जे भारतात तिघाचौघांच्या का होईना कुटूंबात राहतात,त्यांच्याततरी असा संवाद उरलाय का आता? कुठलंही गाऱ्हाणं घेऊन आश्वासकपणे ज्यांच्याकडे जाता येईल असे आजी आजोबा तरी कितीजणांना उरलेत?
या सगळया प्रश्नांची उत्तरं आता इतकी सोपी राहिलेली नाहीत किंवा हे सगळं खोटं आहे,पडद्यावरचं आहे हेही मला माहीत आहे पण ही सिरियल बघताना जे जाणवलं ते कागदावर उतरवण्यासाठी हा ‘प्रपंच’.

3 comments:

  1. The best thing about your writing style is that वाचतांना तू ते सांगत आहेस आणि आपण ते तुझ्या आवाजात ऐकत आहोत असा भास होतो. ह्याला कारण बहुधा तू जसं सुचलं तसा थेट (with little/no literary modifications) लिहित असावीस...
    असं किमान मला तरी वाटलं!

    ReplyDelete
  2. हो..मी बऱ्यापैकी जसं सुचेल तसं लिहिते आणि याचं अजून एक कारण मला असं वाटतं की मी voice over artist आहे त्यामुळे मी ते माझ्या नकळत बोलतही असेन लिहिताना...पण मी गेले जवळ वर्षभर या ना त्या कारणाने लिहिण्याचा आळस करते आहे ते पुन्हा सुरू करायला हवं असं वाटतंय...तुझ्या comment ने हुरूप आलाय. धन्यवाद

    ReplyDelete
  3. खरयं. ती मालिका आजही मला "प्रचंड" आवडते... असं वाटतं की ती कधीच बंद पडूच नये, नाही?
    जर तुम्ही फेसबुकवर असाल तर प्रपंचच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची आग्रहाची विनंती: https://www.facebook.com/#!/home.php?sk=group_159877657396311&ap=1

    ReplyDelete