कुणीही संत म्हणून जन्माला येत नाही. संतपदाला तुम्हाला पोचवण्यात तुमच्या आयुष्यातील बारीकसारीक घटनांचा, जडणघडणीचा महत्वाचा वाटा असतो. दहा वर्षांचा एक अल्लड मुलगा ते संत परंपरेतील कळस ठरलेले संत तुकाराम महाराज हा जीवनप्रवास म्हणजे एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला ‘तुकाराम’ हा सिनेमा. आपल्याला तुकाराम महाराज माहित आहेत ते थेट संतपदाला पोचलेले. पण एकदम कुणी संतपदाला पोचत नाही.
तुका (पद्मनाभ गायकवाड) हा देहू गावी १६०८ साली जन्मलेला तुमच्या आमच्यासारखाच लहान मुलगा. मित्र जमवून दिवसभर विटी दांडू, लगोरी, सूर पारंब्या खेळत गावभर धुडगूस घालणारा आणि घरात वंशपरंपरागत वारीची परंपरा असल्यामुळे विठ्ठलाला आपल्यातलाच एक समजणारा.
तुकारामाचे वडिल, वोल्होबा
अंबिलेंचा (शरद पोंक्षे) सावकारीचा धंदा असल्यामुळे घरात श्रीमंती नांदत होती.
त्यांची आई (प्रतिक्षा लोणकर) ही एक प्रेमळ आणि कर्तृत्ववान माऊली. वोल्होबाही
पंढरीची वारी कधीही न चुकवणारे विठ्ठलभक्त, पण सावकारीचा व्यवसाय आणि देवभक्ती यात
त्यांनी कधीही गल्लत केली नाही. तुकारामांचा मोठा भाऊ सावजी(वृषसेन दाभोळकर) याचे
मात्र विठ्ठलाशिवाय कुठेच लक्ष नसते. अगदी लग्नाची बायको मंजुळाकडे(स्मिता तांबे)
ते आयुष्यभर पहातदेखील नाहीत. त्यामुळे तुकारामांना लहान वयातच वडिलांच्या
कारभारात मदत करीत कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागते. योग्य वेळ आल्यावर त्यांचे
रखमेशी (वीणा जामकर) लग्न लावले जाते. पण रखमेच्या आजारपणामुळे तिला मूल होण्याची
शक्यता नसते. ही परिस्थिती आणि घरच्यांची मने ओळखून रखमाच तुकारामांना(जितेंद्र
जोशी) त्यांच्या मनाविरूद्ध दुसरे लग्न करायला लावते आणि त्यांची दुसरी पत्नी आवली(राधिका
आपटे) घरात येते. पण सवतींमधला समजूतदारपणा आणि बहिणीसारखे संबंध घराला आधारच
देतात. असे सगळे गुण्यागोविंदाने चालले असताना आणि घराची भरभराट होत असतानाच
दुष्काळाची चाहूल लागते. पण दुष्काळाला घाबरून सावकाराला आपला धंदा सोडून चालत
नाही या विचारानुसार नेमके याचवेळी वडिल तुकारामांना वसुलीला पाठवतात. तुकारामांच्या
मनाला पटत नसूनही त्यांना वसुलीला जावे लागते. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचे निधन
होते व वसुलीच्या पापाचे वाईट फळ आपल्या कुटुंबाला मिळाल्याची जाणीव तुकारांमांना
आत कुठेतरी होते. त्यानंतर अंबिलेंच्या घरावर दुःखाचे पहाड कोसळू लागतात व
प्रत्येक दुःखातून होणारी दाहक अशा सत्याची जाणीव तुकारामांचे मन जाळीत जाते. बघता
बघता होत्याचे नव्हते होते आणि सावकाराच्या घरात मृत्यु झाल्यावर
बाराव्या-तेराव्याच्या निमित्ताने का होईना पण मिळालेल्या जेवणावर तुटून पडणारी
आणि पुढच्या मृत्युची वाट पाहणारी दुष्काळी भूकेली माणसे पाहिल्यावर ते आपल्या
घरातली धान्याची कोठारे गावापुढे मोकळी करतात. काही काळाने घरातील सावकारीचा धंदा
आपला धाकटा भाऊ कान्हावर (विकास पाटील) सोपवून ते या सगळ्यातून निवृत्त होतात. ‘वृक्षवल्ली
आम्हा सोयरे वनचरे’ म्हणत, अभंगरचना करत दर्याखोर्यातून हिंडू लागतात. पण आवली
त्यांना परखड शब्दात संसारकर्तव्याची जाणीव करून देते आणि ते पुन्हा संसाराला
लागतात. देवाची अखंड भक्ती करता यावी म्हणून अंबिलेंच्या पारंपारिक देवळाचा
जिर्णोद्धार करतात व भजन-प्रवचनातही रमतात. पण एका कुणबी वाण्याने अभंगरचना करावी
हे त्याकाळच्या रूढी-परंपरेनुसार ब्राह्मणांना रुचणे शक्य नसते व मंबाजीच्या(यतिन
कार्येकर) मदतीने धर्मपीठाकडून तुकारामांचा छ्ळ सुरू होतो. त्या छळाचे परिवर्तन
नक्की कशात होते हा इतिहास जरी आपल्याला माहित असला तरी तो पडद्यावर कसा साकारला
आहे हे पाहणे नक्कीच आनंददायी आहे.
संजय छाब्रिया
यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद हे अजित दळवी आणि
प्रशांत दळवी यांनी लिहिले आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘बिनधास्त’ नंतर अनेक
वर्षांनी पुन्हा एकदा सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. जितेंद्र जोशी तुकारामाच्या
भूमिकेत चांगलाच एकरूप झालेला आहे आणि चित्रपटातील एक ना एक कलाकारांनी चित्रपट
उत्तम बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे. मूळात गायक असलेल्या पद्मनाभ गायकवाडच्या
निरागस अभिनयाचे विशेष कौतुक करायला हवे.
अशा चित्रपटाचे संगीत
करणे हे एक वेगळे आव्हान होते पण अवधूत गुप्ते आणि अशोक पत्की यांनी एकत्रितपणे ते
उत्तम पेलले आहे. ‘गन्या मना तुका, संतु दामा पका, नका भांडू रामा पांडू, चला खेळू
विटी दांडू’ या छोट्या तुकारामावर चित्रीत झालेल्या गाण्याने विशेष मजा आणली आहे.
सारेगम स्पर्धेतील गायक ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरूद्ध जोशी, जान्हवी प्रभू-अरोरा,
पद्मनाभ गायकवाड आणि स्वत: अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. अवघ्या
४२ वर्षांच्या आयुष्यात तुकारामांनी ४५०० अभंगांचा खजिना निर्माण केला परंतु
त्यातील निवडक अभंगांचा गरजेपूरताच आणि योग्य वापर या चित्रपटात केला गेला आहे. शिवाय
कवी दासू यांचे काव्य कुठेही त्या काळाशी विसंगत वाटत नाही.
महाराष्ट्राचे
एक थोर संत एका नवीन रूपात आणि आजच्या काळाला अनुसरून असलेल्या
सिनेमामाध्यमाद्वारे ७६ वर्षांनी पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर अवतरत आहेत. या
निर्मितीमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होऊन आपणही पांडुरंगमय व्हायला काहीच हरकत
नाही.
No comments:
Post a Comment