चारूहास पंडीत आणि प्रभाकर वाडेकरांचं काल्पनिक अपत्य असलेला चिंटू खरं तर आता २१ वर्षांचा आणि सज्ञान झालाय पण तो आपल्याला वर्तमानपत्रातील हास्यचित्रमालिकेतून भेटणारा चिंटू..पण हाच चिंटू आणि त्याची गॅंग खास मे महिन्याच्या सुट्टीत मुलांना भेटायला मोठ्या पडद्यावर अवतरली आहे
फेसबूकवरून मित्र जमवण्याचा आणि मैदानी खेळ व्हर्च्युअल पद्धतीने खेळण्याचा आजचा जमाना. त्यामुळे चिंटू व त्याची मिनी, बगळ्या, नेहा, पप्पू, सोनू आणि राजू ही मित्रमंडळी यांनी चित्रपटात घातलेला धुडगूस पाहायला मुलांना नक्कीच धमाल येईल.
फेसबूकवरून मित्र जमवण्याचा आणि मैदानी खेळ व्हर्च्युअल पद्धतीने खेळण्याचा आजचा जमाना. त्यामुळे चिंटू व त्याची मिनी, बगळ्या, नेहा, पप्पू, सोनू आणि राजू ही मित्रमंडळी यांनी चित्रपटात घातलेला धुडगूस पाहायला मुलांना नक्कीच धमाल येईल.
तशी चिंटू या
हास्यचित्रमालिकेला स्वतःची अशी काहीच कथा नाही त्यामुळे त्याचा चित्रपट तयार
करताना त्याभोवती एक काल्पनिक कथा गुंफणे जरूरीचे होते. ते काम केले आहे विभावरी
देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले यांनी. चिंटू व त्याची मित्रमंडळी ही शहराच्या उच्च
मध्यमवर्गीय भागात राहणारी आहेत. त्याच्या या गँगची परिक्षा नुकतीच संपलेली असते
आणि सुट्टीमधले त्यांचे ‘उद्योग’ सुरू असतात. पण चिंटुच्या मनात मात्र वेगळंच असतं.
त्यांना नेहमीच क्रिकेटमध्ये हरवणार्या ‘विंचु वॉरियर्स’शी यावर्षी काहीही करून
मॅच जिंकायचीच असं तो त्याच्या सगळ्या गँगला सांगतो व सगळे मिळून बनतात ‘वानरवेडे
वॉरियर्स’. क्रिकेट मॅचचा दिवस ठरतो आणि सगळयांचा सराव जोरात चालू होतो. चपळ शरीर,
सकस आहार, व्यायाम, धावणे-पळणे काही विचारू नका. शेवटी एकदाचा मॅचचा दिवस उजाडतो. मॅच
रंगात आली असताना आणि ‘वानरवेडे वॉरियर्स’ चक्क जिंकण्याची शक्यता निर्माण झाली
असतानाच एक भलतंच आणि अनपेक्षित विघ्न उभं राहतं. ती मॅच तशीच अनिर्णित राहते पण
या समस्येमुळे सगळेच अस्वस्थ होतात. तसा या समस्येचा मुलांच्या आईबाबांना काहीच
त्रास जाणवत नाही त्यामुळे त्यांच्याकडून याबाबत काहीच हालचाल होत नाही. शेवटी ‘ज्याचे
जळते त्यालाच कळते’ या उक्तीनुसार मुले त्यावर स्वत:च उपाय काढायचा ठरवतात आणि या
‘विक्राळ’ समस्येचा फडशा पाडतात. काय असतं हे विघ्न आणि कसा होतो समस्येचा आणि
मैदानावरचा खराखुरा सामना? हे दाखवायला तुमच्या मुलांना नक्की न्यायला हरकत नाही.
मराठीमध्ये अनेक
काळानंतर आणि तोही हास्यचित्रमालिकेवर पहिल्यांदाच बालचित्रपट निर्माण झाला आहे.
आयएमई मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीरंग
गोडबोलेंनीच केले आहे. चित्रपटाच्या निमित्ताने बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा संदीप-सलिल
ही जोडी निरागस बालगीते घेऊन लोकांच्या समोर आली आहे. चिंटुसाठी पार्श्वगायन केलं
आहे ते सलीलचा मुलगा शुभंकर कुलकर्णी याने. गाणी लहान मुलांना आवडतील आणि
मोठ्यांनाही गुणगुणावीशी वाटतील अशी नक्कीच आहेत.. चिंटुचा खट्याळ आणि निरागसपणा
चेहर्यावर आणि अभिनयात दाखवण्यात शुभंकर अत्रे कुठेही कमी पडत नाही. त्याचबरोबर
मिनी (सुहानी धडफळे), नेहा (रुमानी खरे), बगळ्या (अनिमेश पाध्ये), राजु (वेद रावडे
पप्पू (निशांत भावसार) आणि सोनू (अर्जुन जोग) यांची निवडही योग्य ठरते. विंचु
वॉरियर्सही छोट्याशा भूमिकेत असले तरी आवडून जातात. विभावरी देशपांडे, सुबोध भावे,
श्रीराम पेंडसे, विजय पटवर्धन, ओम भूतकर, नागेश भोसले, दिलिप प्रभावळकर आणि भारती
आचरेकर यांच्या भूमिका चित्रपटाला आधार देतात. पण जास्त लक्षात राहतो तो अतिशय
नैसर्गिकरित्या अभिनय करणारा सतीशदादा(आलोक राजवाडे) आणि कर्नलच्या छोट्याश्याच
भूमिकेत असणारे पद्मश्री सतिश आळेकर.
चित्रपटामध्ये आवर्जून लक्ष जाते ते सर्व
कलाकारांच्या वेशभूषेकडे. सिनेमात एक व्यक्तिरेखा एकाच डिझाईनचे कपडे परिधान करते
फक्त त्याचे रंग बदलत राहतात. अगदी चिंटुची आईदेखील याला अपवाद नाही. सुरूवातीला
ही गोष्ट डोळ्यांना खटकल्याशिवाय रहात नाही पण मग हा सिनेमा हास्यचित्रमालिका डोळ्यासमोर
ठेवून बनवला गेला असल्याचे लक्षात आल्यावर त्या गोष्टीचा तसा त्रास होत नाही. गीता
गोडबोले यांनी कलाकारांच्या वेशभूषेची जबाबदारी स्वीकारली आहे. पण त्यांनीच केलेली
कलाकारांची रंगभूषा मात्र (विशेषत: विभावरी व सुबोधची) फारच भडक व हौशी
रंगभूषाकाराने केल्यासारखी वाटते. आणि चित्रपटात लॉंगशॉर्ट्सचा अभाव असल्यामुळे ते
जास्तच जाणवते. चिंटुची गृहिणी असलेली आई रात्री त्याला कुशीत घेऊन झोपतानाही तशीच
चित्रातल्यासारखी मेक अप केलेली दिसेल हे पटत नाही. पण तुम्ही जर चित्रपट मूल
म्हणून पाहिलात तर हे दोष तुम्हाला जाणवणारही नाहीत कारण सर्वच बालकलाकारांचा धमाल
अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
एकूण काय तर
मुलांना एकट्यांनाच सिनेमा बघायला पाठवलंत तर तुम्ही फार काही गमवाल असं नाही पण
बरोबर गेलात तर तुमचं मागे पडलेलं बालपण निदान तेवढा काळ तरी तुम्हाला
चित्रपटगृहाच्या अंधारात पुन्हा सापडेल.
No comments:
Post a Comment