भारतीय? म्हणजे
नक्की काय? आपण केवळ भारतात राहतो म्हणजे भारतीय आहोत? एक भारतीय म्हणून आपल्याला
मिळाल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी मिळतात का आपल्याला सहज? हो, मोबाईल मिळतो
आरामात. (कदाचित खूप गरीब असलात तर आता मोफतही मिळेल) पण रोज पुरेशी वीज आणि पाणी
मिळतं का? आणि आपल्याच देशात आपली अवस्था अशी का? असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमीच
पडत असतात पण आपण ‘अरे असंच चालणार रे या
देशात’ असं म्हणत टेबलवर बसून चहाच्या घोटाबरोबर हे प्रश्न गिळून टाकतो.
असाच एक प्रश्न आपल्यासमोर मांडला गेलाय, देविशा फिल्म्सची कलाकृती
असलेल्या ‘भारतीय’ या सिनेमातून. ग्लोबल होऊ पाहणार्या भारतातल्या, लोकलही
नसलेल्या ‘अडनिडं’ या एका नखभर खेड्याची ही गोष्ट. महाराष्ट्र आणि कर्नाटक
सीमेवरंचं हे खेडं. घर का ना घाट का अशी अवस्था असलेल्या आणि आपल्या नावाला
जागणार्या या खेड्याला भारताच्या नकाशात स्थानच नाही. वीज, रस्ता, पाणी, शिक्षण
अशा स्वतंत्र भारतात कमीतकमी अपेक्षा असलेल्या कुठल्याच गोष्टी या खेड्यात पोचलेल्या
नाहीत पण मोबाईल मात्र आहे. हो रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे पण ती काय मिळते थोडी
खटपट केली की. शाळेचा पत्ता नाही पण भारताचा स्वातंत्र्यदिन आला म्हणून प्रतिज्ञा
मात्र सगळे पाठ करतायत. आणि मग त्यातल्या श्रीपतीला(जितेंद्र जोशी) प्रश्न पडतो की
सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण भारतीय म्हणजे काय? याच प्रश्नाचं उत्तर शोधलं
जातं ते या सिनेमातून.
या सिनेमात मकरंद अनासपूरे वावरतो ते एका सूत्रधाराच्या रूपात.
तोच चित्रपट सुरू करतो आणि तोच संपवतो. हेळवी ही मकरंदने साकारलेली भूमिका म्हणजे
त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकेंपेक्षा खूप वेगळी आहे. हेळवी म्हणजे गावागावात
आपल्या नंदीसह फिरून वंशावळी लिहिणारी जमात. ज्या गावांचा इतिहास कुठेच लिहिला गेला
नाही त्याची या हळवींना मात्र खडानखडा माहिती असते. आणि गरजेपूरतं वेळप्रसंगी ते
गावाचं भविष्यदेखील वर्तवू शकतात. गावात वर्षानुवर्षे चालत आलेली सरदेशमुखी
याच्यावर लोकं समाधानी आहेत पण त्याउलट गावातल्या लाडे पाटलाला (कुलदीप पवार)
मात्र गावात ‘डेमॉक्रशी’ आणून स्वतःला सरपंच व्हायचंय. आधी म्हटल्याप्रमाणे गावाची
नोंद कुठेच नसल्यामुळे खरं तर हे सरदेशमुखही (डॉ.मोहन आगाशे) गावात काही
पिढ्यांपूर्वी येऊन राहिलेले उपरे कुटुंब आहे. पण हे तेव्हा लक्षात येतं जेव्हा
मूळ सरदेशमुखांपैकी एक असलेला अभय सरदेशमुख (सुबोध भावे) अनेक पिढ्यांनंतर गावाला
भेट देण्याचं ठरवतो. सरदेशमुखांना कधीच न लाभलेली प्रॉपर्टी म्हणजे सरदेशमुखांचा
वंशपरंपरागत वाडा अभय विकायचं ठरवतो पण अनेक कचेर्यांच्या अनेक फेर्या घालूनही
वाड्याची सात-बाराच्या उतार्यासारखी कागदपत्रं कुठेच उपलब्ध नसतात. शेवटी हताश झालेल्या
एका क्षणी हळीव त्याला सरदेशमुखांचा आणि अडनिड गावाचा इतिहास सांगतो. त्यामुळे आईने
आणि सरदेशमुख कुटुंबातील प्रत्येकाने अनेक वेळा मनाई करूनही, वर्षानुवर्षे बंद
असलेलं वाड्याचं तळघर अभय उघडतो. आणि त्या तळघरात असं काही सापडतं की ज्यामुळे
इतिहासाने स्वीकारलं पण भूगोलाने नाकारलं अशी अवस्था असलेलं हे अडनिडं मिडीयासकट
सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. स्थानिक म्हणूनही न गणलं गेलेलं गावातलं राजकारण बघता
बघता जागतिक बनतं, सगळा देश ढवळून काढतं. पण हे सगळंच इथे
सांगण्यात मजा नाही कारण ही ढवळाढवळ पडद्यावर आवर्जून बघण्यासारखी आहे.
अभयच्या या
सुरूवातीला वेडेपणा म्हणून गणल्या गेलेल्या कामात त्याच्या कायम पाठीशी उभी राहतात
ती दोन माणसं. एक म्हणजे गावातील एकमेव सरकारी नोकर महिपती (ऋषिकेश जोशी) आणि
सरदेशमुखांची कोल्हापूर पुण्याकडे जाऊन शिकून आल्यामुळे स्मार्ट झालेली मुलगी
सुगंधा (मिता सावरकर). (तरीदेखील ती काही मोजकीच वाक्यं अशुद्ध मराठीत का बोलते ते
समजत नाही). चित्रपटात कथेच्या ओघात अनेक पात्रं येतात पण सुबोध, डॉ. आगाशे,
कुलदीप पवार आणि मकरंद सोडल्यास बाकीच्यांना स्वतःची खास अभिनयक्षमता दाखवण्याची
फारशी संधी या सिनेमात नाही. तरीदेखील प्रत्येकाने आपली कामं प्रामाणिकपणे केली
आहेत. चित्रपटातली गाणी चांगली आहेत पण आवर्जून परत परत ऐकल्याशिवाय आवडणार नाहीत.
अजय-अतुल आपली फारशी जादू या सिनेमात दाखवू शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे सिनेमातील
चार गाण्यांपैकी तीन गाणी आवर्जून अमराठी गायकांना गायला देऊन त्यांनी विशेष काही
साधले आहे असे वाटत नाही. सगळ्यांनी गाणी अप्रतिम गायली आहेत याबद्दल दुमत असणार
नाही पण अजय-अतुलचा अनेक चित्रपटापांसूनचा मराठी गाण्यांसाठीचा अमराठी आवाजाचा
हट्ट कळत नाही. मराठमोळं पारंपारिक चालीतलं ‘बघ उघडूनी दार अंतरंगातलं देव गावंल
का?’ हे भजन रूपकुमार राठोडजींच्या आवाजात खटकतं. उलट ते गाणं स्वतः अजयने गायला
हवं होतं असं वाटल्याशिवाय रहात नाही. फक्त ते गाणं चित्रपटात ज्या प्रसंगी येतं
तो प्रसंग खूप परिणाम साधून जातो. या सगळ्याला अपवाद फक्त नंदेश उमपने खणखणीत आवाजात
गायलेल्या पोवाड्याचा. या सिनेमाच्या निमित्ताने कवी संदीप खरेने पहिल्यांदाच
अजय-अतुल बरोबर गीतकार म्हणून काम केलं आहे. त्याने लिहिलेलं ‘युगे युगे आहोत इथे
तरी आम्ही व्हॅलिड आहोत अनं आमचं केव्हाच ठरलंय अवं आम्ही लई सॉलिड आहोत’ हे गाणं
टिपिकल संदीप छाप आहे.
चित्रपटाचा मूळ पाया असलेली कथा-पटकथा आणि संवाद चांगले असतील तर
अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते असं म्हणतात. तशी एक अनिरूद्ध पोतदार यांनी लिहिलेली
चांगली कथा या सिनेमाला मिळाली आहे.. संजय पवारांचे संवाद खटकेबाज आहेत. दिग्दर्शक
गिरीश मोहिते यांनी याआधी ही पोरगी कुणाची या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे, ज्याला
फारसे यश मिळाले नव्हते. पण या सिनेमात मात्र त्यांच्या दिग्दर्शनातली परिपक्वता
जाणवते. भारतीयची ही कथा सीमाप्रश्नांशी निगडीत असली तरी त्यात सीमावादावर कोणतेही
भाष्य नाही असे दिग्दर्शक स्वतःच म्हणतात.
‘भारतीय’
एकाचवेळी १८५ चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून पुढच्या महिन्यापासून भारताबाहेरही
रसिकांसाठी प्रदर्शित केला जाईल.
मुळचे तंत्र
उद्योजक असलेल्या अभिजीत घोलप यांनी देविशा फिल्म्सची स्थापना करून एक अत्यंत
चांगले पाऊल उचलले आहे. त्यांची पहिली निर्मिती होती ‘देऊळ’ ज्या सिनेमाने तीन
राष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच अनेक सन्मान मिळवले. आणि आता त्यांची दुसरी निर्मिती
आहे ‘भारतीय’. एक चांगला सिनेमा बनण्यासाठी लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेत्यांबरोबरच
चांगला निर्माता मिळणंही तितकंच आवश्यक असतं तरच एक सुबक कलाकृती तयार होते हे हा
सिनेमा बघताना नक्की जाणवतं.
No comments:
Post a Comment